कुतूहल भाग - 12 गारांचा पाऊस कसा पडतो ?

गारांचा पाऊस कसा पडतो?



        आपल्याकडे देशावर काही वेळा ऐन उन्हाळ्यात गारांचा पाऊस पडतो. सुपारीएवढ्या गारा आकाशातून कोसळू लागतात. गारांचा पाऊस शेतीला हानिकारक ठरू शकतो. लहान गोट्यांपासून चेंडूच्या आकारापर्यंत गारांचे आकार असू शकतात. गारांच्या मायने काचा फुटतात आणि माणसांनाही इजा पोहोचते.


        सामान्यतः गारांचे तीन प्रकार आढळतात. पांढऱ्या गोटीच्या आकाराच्या गारा मऊ असतात. त्यांचा बोटांनीही चुरा करता येतो. मध्यम आकाराच्या गारा शुद्ध बर्फाच्या बनलेल्या असतात. मोठ्या गारांचा रंग दुधट असतो. त्या फोडल्या की त्यांमध्ये कांद्यासारखे विविध स्तर आढळतात.
   
        प्रचंड आकाराच्या क्युम्युलोनिंबस ढगांमधून गारांचा पाऊस पडतो. अशा ढगाचा तळ भूपृष्ठापासून सुमारे ६०० मीटर (२००० फूट), तर माथा १०,००० मीटर (३०,००० फूट) अंतरावर असतो. हा ढग बहुतांश अतिशीत (सुपर कूल्ड) पाण्याच्या थेंबांचा बनलेला असतो. खाली पडणारा बर्फाचा कण लहानसा पाण्याचा थेंब पकडतो. त्यामुळे पाणी तात्काळ गोठून जाते आणि बर्फाच्या कणावर एक थर जमून तो मोठा होतो. खालून येणाऱ्या वाऱ्यांनी हा कण वर फेकला जातो. वर जाताना त्याच्यावर अधिकाधिक पाण्याचे थेंब गोठत जातात. 
        अशा प्रकारे वरून खाली आणि खालून वर जात असताना मूळ बर्फाच्या कणावर गोठलेल्या पाण्याचे अनेक थर जमा होतात. या चक्राची अनेकदा पुनरावृत्ती झाली की मूळ बर्फाचा कण चांगलाच मोठा होतो आणि तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने भूपृष्ठाकडे खेचला जातो आणि भूपृष्ठावर गारांचा पाऊस पडू लागतो.
        जगातील बहुतांश देशांत गारांचा पाऊस पडतो. गिनीज बुकच्या उच्चांकानुसार १४ एप्रिल १९८६ रोजी बांगलादेशच्या गोपाळगंज जिल्ह्यात जो गारांचा पाऊस पडला त्यामध्ये ९२ लोक मारले गेले. मोठ्यात मोठी गार एक किलो वजनाची होती. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.