What is air humidity? कुतूहल भाग - 6 हवेची आर्द्रता म्हणजे काय ?

 

हवेची आर्द्रता म्हणजे काय ?

 


         धनरूप, द्रवरूप आणि वायुरूप अशा पाण्याच्या तीन अवस्था आहेत. पाण्याच्या घनरूप अवस्थेला आपण बर्फ म्हणतो. द्रवरूप अवस्थेतील पाणी हे पाणीच असते. पाण्याची वायुरूप अवस्था म्हणजे बाष्प. सूर्याचे किरण पाण्याचे तापमान वाढवितात आणि पृष्ठभागावरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. बाष्पाचे रेणू हवेच्या रेणूंमधील जागा व्यापतात. हवेत असलेल्या पाण्याच्या बाष्पाला आर्द्रता किंवा ह्युमीडिटी असे नाव आहे.

 

            दररोज तापमानात थोडाफार बदल होत असल्यामुळे दररोज आर्द्रतेचे प्रमाण बदलते. हवा किती बाष्प सामावून घेऊ शकेल हे हवेच्या तापमानावर अवलंबून आहे. थंड तापमानात हवेच्या रेणूंची गती मंद असते, त्यामुळे बाष्पाचे कण परस्परांशी संयुक्त होऊ शकतात. उष्ण तापमानात हवेच्या व बाष्पाच्या रेणूंची गती जास्त असते, त्यामुळे बाष्पाचे रेणू परस्परांशी संयुक्त होऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ, हवेचे तापमान २५ अंश सेल्सिअस असताना प्रति घनमीटर जास्तीत जास्त २२ ग्रॅम बाष्प हवा सामावून घेऊ शकते, पण तापमान १५ अंश सेल्सिअस असेल तर हवेमध्ये प्रति घनमीटरला १३ ग्रॅमपेक्षा जास्त बाष्प असणार नाही. विशिष्ट तापमानात हवेने किती बाष्प सामावून घेतले आहे, ही गोष्ट निरपेक्ष आर्द्रतेने (अॅब्सोल्यूट ह्युमीडिटी) निर्देशित केली जाते. रेडिओ किंवा दूरदर्शनवर हवामानाचा अंदाज देताना जी आर्द्रता सांगितली जाते ती निरपेक्ष आर्द्रता नसून सापेक्ष आर्द्रता (रिलेटिव्ह ह्युमीडिटी) असते. सापेक्ष आर्द्रतेवरून पावसाच्या आगमनाचा अंदाज करता येतो. 

सापेक्ष आर्द्रतेची व्याख्या अशी आहे -

             विशिष्ट तापमानात हवेमध्ये असलेल्या बाष्पाचे प्रमाण आणि ती त्याच तापमानात किती उच्चतम बाष्प धारण करू शकते, यांचे गुणोत्तर सापेक्ष आर्द्रता या नावाने ओळखले जाते. सापेक्ष आर्द्रता टक्क्यांमध्ये मोजली जाते.

 सापेक्ष आर्द्रता = निरपेक्ष आर्द्रता / बाष्पधारणाची उच्चतम क्षमता × 100 टक्के

 उदाहरणार्थ : हवेचे तापमान १० अंश सेल्सिअस असताना तिची बाष्प धारण करण्याची उच्चतम क्षमता प्रतिघनमीटरला ११ ग्रॅम आहे, पण प्रत्यक्षात त्या तापमानाला हवेत ५.५ ग्रॅम/ घनमीटर बाष्प असेल तर

 सापेक्ष आर्द्रता = 5.5  / 11 × 100 = 50 टक्के

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.